छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील कर्जदारांचा छळ करून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या पैसे वसूल करण्यासाठी इगतपुरी येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा छत्रपती संभाजीनगर व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या प्रकरणी कॉल सेंटर चालवणारे नरेंद्र शशिकांत भोंडवे (३२, रा. इगतपुरी) व पारस संजय भिसे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
हा प्रकार उघडकीस आला तो छत्रपती संभाजीनगर येथील एका ३१ वर्षीय महिला वकिलाच्या तक्रारीनंतर. १५ सप्टेंबर रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला. एका महिलेकडील कर्जाच्या निमित्ताने थेट धमक्या, अश्लील शिवीगाळ सुरू करण्यात आली. संबंधित वकिलाचा त्या कर्जाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही, कर्जदार महिलेला कॉन्फरन्स कॉलवर घेऊन वकिलेसह त्यांच्या घर परिसरातील महिलांना अश्लील भाषेत धमकावण्यात आले. संतप्त होऊन वकिलांनी थेट सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पांढरे यांनी केलेल्या तपासात कॉलचे क्रमांक इगतपुरीतील असल्याचे निष्पन्न झाल्याने नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
नंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी इगतपुरीतील मीनाताई ठाकरे संकुलात धाड टाकण्यात आली. तेथे ४० ते ५० कर्मचाऱ्यांचे बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे समोर आले. या कॉल सेंटरमार्फत राज्यातील अनेक बँका व पतसंस्थांकडून दिलेल्या कर्जवसुलीचे कंत्राट मिळवून ग्राहकांना त्रास देण्यात येत होता. यामध्ये कर्जदारांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सोशल मीडियावरील संपर्क यादीतील महिलांना लक्ष्य करून अश्लील कॉल केले जात. बँकेच्या नावाखाली बनावट ओळख वापरून कर्जदारांना धमकावणे ही या रॅकेटची पद्धत होती.
पोलिसांनी या कारवाईत २४ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यात मोबाईल फोन, सीमकार्ड आदी साहित्याचा समावेश आहे. या कॉल सेंटरला कोणताही परवाना नसल्याचेही उघड झाले आहे. इगतपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या घटनेनंतर पुन्हा एकदा बेकायदेशीर कॉल सेंटरद्वारे कर्जदारांना त्रास दिला जात असल्याचे स्पष्ट झाले असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य पोलिसांकडून काटेकोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*