छत्रपती संभाजीनगर : शहरातील रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली बुधवारी (दि.१) रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीच्या सूडातून दोन निष्पाप लेकरांसमोरच एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस यंत्रणेतही मोठी धावपळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव सय्यद इमरान सय्यद शकील (३८, रा. सादात नगर) असे आहे. बुधवारी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास इमरान आपल्या आठ वर्षांच्या मुलगा व चार वर्षांच्या मुलीसह रिक्षाने घरी निघाले होते. दरम्यान, कारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने रिक्षासमोर गाडी आडवी लावत अचानक हल्ला चढवला.
प्रथम कोयत्याचा घाव इमरानच्या हातावर बसला. या घावात त्याची बोटे तुटून खाली पडली. दुसरा घाव थेट पाठीमागून मानेवर बसला आणि इमरान रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. क्षणभरातच घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, हत्याकांडाच्या वेळी इमरानची लहानगी मुले रिक्षातच होती. डोळ्यासमोर झालेला वडिलांचा निर्घृण खून पाहून दोन्ही मुले थरथर कापत होती. आरोपी मात्र कारमधून फरार झाले.
जुना वाद ठरला जीवघेणा
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, इमरान यांचा पडेगावातील कुख्यात मुजीब डॉन यांच्या गटाशी काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. तेव्हा तलवार-चाकूंनी झालेल्या हाणामारीत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याच वैरातून सूड उगवण्यासाठी या टोळीने इमरानचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांची धावपळ
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. वाढती परिस्थिती हाताळण्यासाठी राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथके संशयित आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याचे कल्याणकर यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक निरीक्षक शैलेश देशमुख, उपनिरीक्षक दिलीप बचाटे, निर्मला राख यांच्यासह सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत इमरानला घाटी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
परिसरात भीतीचे सावट
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत बघ्यांची गर्दी वाढत राहिली. मुलांसमोरच घडलेल्या या थरारक घटनेने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला असून, आरोपींना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
या घटनेतून पुन्हा एकदा जुन्या वादातून पेटणाऱ्या टोळक्यांच्या दहशतीची झलक दिसली असून, दोन चिमुकल्यांसमोर बापाचा जीव घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*