छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरुवात होण्याआधीच शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू झाले असून चोरट्यांनी तब्बल लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. उस्मानपुऱ्यातील अबोली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला व्यावसायिक सोनाजी पाध्ये यांच्या फ्लॅटचे लॅचलॉक तोडून १७ तोळे सोन्याचे दागिने व ९१ ग्रॅम चांदीची गणपती मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तर, मिटमिटा परिसरातही व्यावसायिकाच्या घरात चोरीची घटना घडली आहे.

सण-उत्सवाच्या काळात अनेक कुटुंब गावाकडे निघून जातात, त्यामुळे अशा वेळी घरफोड्यांच्या घटना वाढतात. शिवाजीनगर, सातारा, देवळाई, वेदांतनगर, औरंगपुरा, सिडको या भागांत दरवर्षी दिवाळीत सर्वाधिक घरफोड्या होतात. मात्र यंदा दिवाळीआधीच चोरांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनाजी पाध्ये या दि. २६ सप्टेंबर रोजी कामानिमित्त कोल्हापूरला गेल्या होत्या. २९ रोजी सकाळी शेजारी धनंजय चिपळूणकर यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून संशय घेतला. त्यांनी तातडीने पाध्ये यांना संपर्क केला व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरात सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. चोरट्यांनी कपाटाचे लॅचलॉक तोडून सोन्याच्या बांगड्या, पाटल्या, तोडेजोड, मोत्याचे हार, अंगठी, कानातले, ब्रेसलेट, नेकलेस, साखळी तसेच ९१ ग्रॅमची चांदीची गणपती मूर्ती असा ऐवज चोरून नेला. हा सर्व ऐवज पाध्ये यांच्या आईचा असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत मिटमिटा येथील व्यावसायिक पवन दिवेकर (३७) हे २८ सप्टेंबर रोजी पत्नीसह गावाला गेले होते. रात्रीतून चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व ५ हजार रुपये रोख, ५ ग्रॅमची सोन्याची नथ आणि चांदीचे पैंजण असा ऐवज चोरून नेला.

पोलिसांनी अपार्टमेंट व घरांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. बहुतांश ठिकाणी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरांना सहज वावर मिळतो. त्यामुळे रहिवाशांनी मिळून सुरक्षारक्षक नेमावा व सीसीटीव्ही बसवावा, असे आवाहन उस्मानपुरा पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

750 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क