छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. लासुर स्टेशन येथे नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात दांडिया खेळत असताना नंदिनी अंबादास पवार (वय ३५) या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी रात्री दांडियाच्या कार्यक्रमात नंदिनी पवार सहभागी झाल्या होत्या. खेळ सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्या जमिनीवर कोसळल्या. उपस्थितांनी तत्काळ त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले. या अचानक झालेल्या घटनेमुळे नवरात्र उत्सवाचा आनंद दुःखात बदलला.

नंदिनी पवार या लासुर स्टेशन परिसरातील रहिवासी असून, आरापूर येथील धनंजय ऑटो कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांच्या पश्चात दोन लहान मुले आहेत. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी सकाळी शवविच्छेदन अहवालानंतर पाडळसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संख्येने नातेवाईक, गावकरी आणि नवरात्र मंडळातील सदस्य उपस्थित होते.

नवरात्र उत्सवात नृत्य, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावात उत्साहाचे वातावरण असते. मात्र, अशा अनपेक्षित घटनेमुळे वातावरणात हळहळ पसरली आहे. गावकऱ्यांनीही त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरुण वयात त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,890 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क