छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात शहरात वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी आणखी एक धाडसी चोरी केली आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आईसाठी दागिने घेण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाची तब्बल २ लाख ८५ हजार रुपयांची रोकड भरदिवसा लंपास करण्यात आली. हा प्रकार क्रांती चौक-उस्मानपुरा मार्गावरील कल्याण ज्वेलर्स शोरूमसमोर शनिवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी घडला. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कपिल दिलीप खंडागळे (वय २८, रा. संभाजीनगर) हे आपल्या आईसाठी दागिने घेण्यासाठी कल्याण ज्वेलर्समध्ये गेले होते. शोरूममध्ये त्यांना हवा असलेला दागिना न मिळाल्याने त्यांनी सोबत आणलेली २ लाख ८५ हजार रुपयांची रोकड मोपेडच्या डिकीत ठेवली. ते दुसऱ्या शोरूमकडे वळणार इतक्यात, एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या मोपेडची डिकी उघडून रोकड असलेली बॅग चोरली. काही क्षणांतच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षक आदित्य भुईगळ यांनी तत्काळ चोरट्यांचा पाठलाग केला. “मी कार पार्क करत असताना, मिररमध्ये मला एक जण डिकीशी छेडछाड करताना दिसला. मी लगेच बाहेर पडलो आणि त्याच्या दुचाकीमागे धावलो. गाडी पकडण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे मडगार्ड तुटून माझ्या हातात आले, पण ते क्षणात नजरेआड झाले,” असे भुईगळ यांनी सांगितले.

घटनेनंतर कपिल खंडागळे यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. सणासुदीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी बाहेर पडतात, त्यामुळे गुन्हेगारांना अशा घटना घडवणे सोपे जाते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शहरात गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. व्यापारी भाग, ज्वेलरी शोरूम परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या चोऱ्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. दरम्यान, या धाडसी चोऱ्याने शहरातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,351 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क