छत्रपती संभाजीनगर : शहरात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसविण्याच्या घटना वाढत आहेत. अशाच प्रकारात गुरुवारी (दि. १६ ऑक्टोबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पैठण रोडवरील मातोश्री हॉस्पिटल परिसरात दोन दुचाकीस्वार भामट्यांनी निवृत्त नागरिक व त्यांच्या पत्नीला फसवून पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केली. या प्रकरणी मधुकर बापूराव कोळेकर (वय ६६, रा. नक्षत्रवाडी, पैठण रोड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

कोळेकर हे वाल्मी संस्थेतून निवृत्त झाले असून गुरुवारी पत्नी शोभाबाई यांच्यासह नक्षत्रवाडी येथील गुरुवारचा बाजार करून घरी परतत होते. ते मातोश्री हॉस्पिटलजवळ पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना थांबवले. त्यापैकी एकाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखविले. त्याचवेळी त्या भामट्याने तिथून जाणाऱ्या आणखी एका व्यक्तीला थांबवून त्याच्याकडील अंगठी तपासण्याच्या बहाण्याने घेतली आणि परत दिली.

यामुळे कोळेकर दाम्पत्याचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर भामट्याने कोळेकर यांना “सध्या खूप चोऱ्या होत आहेत, तुमच्या अंगठीचा नंबर पाहायचा आहे” असे सांगून त्यांच्या पत्नीकडील अंगठी मागितली. शोभाबाई यांनी अंगठी दिल्यानंतर तो ती हातात घेताच आपल्या साथीदारासोबत दुचाकीवरून पळ काढला.

घटनेनंतर कोळेकर दाम्पत्याने तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. या प्रकारात दोन्ही भामटे सुटकेसाठी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा बनावट पोलिसांच्या नावाखाली नागरिकांना फसविण्याच्या टोळ्यांचा धोका अधोरेखित झाला आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडे आपले दागिने देऊ नयेत, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,021 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क