छत्रपती संभाजीनगर – शहरात दिवसाढवळ्या महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सिडको परिसरात होस्टेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वारील चोरट्यांनी महिलेचे १६.८५० ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पोबारा केला. ही घटना सिडको एन-७ येथील मनपा शाळेजवळ १६ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता प्रकाश ढगे (वय ४९, रा. साई मंदिराजवळ, एन-७, सिडको) या फिर्यादी असून त्या त्यांच्या भाडेकरू ज्योती खुनेवाले यांच्यासोबत बजरंग चौकातून घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना थांबवून “पीजी हॉस्टेल कुठे आहे?” असा प्रश्न विचारला. अनिता ढगे यांनी “मला माहिती नाही” असे सांगत पुढे निघाल्या असता, अचानक मागून आलेल्या एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील १६.८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले आणि दुचाकीवर बसून साथीदारासह पळ काढला.

ढगे यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. एका तरुणाने चोरट्यांचा पाठलागही केला, मात्र ते वेगाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला.

दरम्यान, या परिसरात गेल्या काही दिवसांत चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला आहे. मात्र, आजवर अशा घटनांतील कोणत्याही चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IUr4T19zTCmAWLrpodS5ui?mode=ems_copy_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,670 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क