छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई करत चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर धाड टाकली. या धाडीत तब्बल शंभर पेक्षा अधिक तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यातील युवक-युवतींचा समावेश आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर गेल्या एक वर्षापासून गुप्त पद्धतीने सुरू होते. आतमध्ये पडदे लावून रात्रीच्या वेळातच कामकाज चालायचे. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत कार्यरत असणाऱ्या या ठिकाणी उच्चभ्रू गाड्यांमधून कर्मचारी येत असत. कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना “अमेझॉन गिफ्ट व्हाऊचर लागले आहे” या आमिषाखाली फसवणुकीचे कॉल केले जात होते. या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या कॉल सेंटरमध्ये कार्यरत तरुण-तरुणींना दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जात होता. हे केंद्र के. एस. एन्टरप्रायजेस नावाने चालवले जात होते. सदर इमारत मुळे नावाच्या व्यक्तीची असून ते एमआयडीसीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्या मुलांनी कंपनी सुरू करण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र, मुलं परदेशात गेल्यानंतर ही जागा भाड्याने देण्यात आली होती.

पोलिसांनी या कारवाईदरम्यान ५६ पानी करारनामा, संगणक, सर्व्हर, कागदपत्रे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. प्राथमिक तपासानुसार हे केंद्र सॉफ्टवेअर आणि आयटी कामांच्या नावाखाली चालवले जात होते.

या धाडीत प्रभारी पोलीस आयुक्त संदीप हिरेमठ, उपआयुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे गजानन कल्याणकर, आणि एमआयडीसी सिडकोचे पोलीस निरीक्षक गीता अरगडे यांच्यासह १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. सध्या ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी सुरू असून, त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,692 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क