छत्रपती संभाजीनगर: थायलंडमध्ये उच्च पगाराच्या मार्केटिंग मॅनेजरच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेला फसवून चॅटींग स्कॅम करणाऱ्या कंपनीत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या हालअपेष्टांनंतर महिलेने स्वतःच्या सुटकेसाठी मोठी रक्कम भरून भारतात परतण्यास यश मिळवले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी महिला घटस्फोटानंतर नोकरीच्या शोधात शहरात आली होती. वृत्तपत्रातील जाहिरातीवरून तिला “एफ व्होल्ट” नावाच्या कंपनीत नोकरी मिळाली. ही कंपनी उल्कानगरी रोडवरील शंकरा रेसीडन्सी परिसरात असल्याचे सांगण्यात आले होते. कंपनीचा मालक अविनाश रामभाऊ उढाण (रा. श्रीनगर, गारखेडा) याच्याशी ओळख वाढल्यानंतर त्याने थायलंडमध्ये चांगल्या पगाराची मार्केटिंग मॅनेजरची नोकरी असल्याचे सांगून महिलेला प्रलोभन दिले.
त्यासाठी त्याने महिलेपासून दीड लाख रुपये घेतले आणि नोकरी निश्चित झाल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात अविनाश उढाण याने तिला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोडले, जिथून ती थेट बँकॉकला गेली. बँकॉक विमानतळावर हरपीत सिंग नावाचा व्यक्ती तिला भेटला आणि कंम्पोट (कंबोडिया) येथील “क्रिएटीव्ह माईंडसेट” नावाच्या कंपनीत नेऊन सोडले.
तेथे पोहोचल्यावर तिला खरी परिस्थिती समजली. ती कंपनी प्रत्यक्षात चॅटींग स्कॅम करणारी ठरली, जिथे जबरदस्तीने ऑनलाइन फसवणूक करावी लागत होती. काही दिवसांतच महिलेला लक्षात आले की अविनाश उढाण यानेच तिला विक्री केले आहे. तिला तिथून बाहेर पडता येत नसल्याने तिने दोन महिन्यांनी २,००० यूएस डॉलर (सुमारे १.६५ लाख रुपये) भरून स्वतःची सुटका करून घेतली.
यानंतर तिने कंबोडियातील भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. त्यांच्या मदतीने ती २१ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावर पोहोचली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला सहार पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर महिलेने आरोपी अविनाश उढाणविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली.
पुंडलिकनगर पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक, मानवी तस्करी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे परदेशात नोकरीच्या आमिषाखाली महिलांची सुरू असलेली फसवणूक आणि बेकायदेशीर मानवी व्यापार पुन्हा एकदा समोर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*