दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. संध्याकाळी साधारण 6.45 वाजण्याच्या सुमारास मेट्रोच्या गेट क्रमांक 1 जवळ उभी असलेल्या कारमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिक काही क्षणांसाठी भयभीत झाले. स्फोटानंतर आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी स्फोटानंतर काही वेळ पूर्ण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मोठी गर्दी केली. कारमधून उठलेल्या ज्वाळांनी शेजारी उभ्या असलेल्या आणखी दोन वाहनांनाही आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दिल्ली पोलिसांनी तत्काळ परिसराला सुरक्षा घेरा घातला असून वाहतूकही काही काळासाठी वळविण्यात आली.

या घटनेमागे कोणतीही तांत्रिक बिघाडाची शक्यता आहे का किंवा हा कोणताही घातपाताचा प्रयत्न आहे का, याबाबतचे अनुमान सध्या जोर धरत आहेत. बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. स्फोटाची तीव्रता बघता कारमध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य होते, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख आढळण्यासाठी पोलिस प्रयत्न करत असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील फरिदाबाद येथे अलीकडेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि दोन एके-47 बंदुका जप्त केल्या होत्या. तब्बल 300 किलो आरडीएक्ससह झालेल्या या कारवाईमुळे सुरक्षेच्या दृष्टीने आधीच चिंता निर्माण झाली होती. दिल्लीतील स्फोटामुळे आता या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू झाली आहे.

सध्या पोलीस, अग्निशामक विभाग आणि सुरक्षा यंत्रणा उच्च सतर्कतेवर असून लाल किल्ला परिसरातील सुरक्षा आणखी वाढविण्यात आली आहे. या घटनेचा तपास गतीने करून लवकरात लवकर खरे कारण समोर आणले जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,530 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क