छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मध्यवर्ती पैठण गेट–सब्जी मंडी परिसरात सोमवारी रात्री उशिरा प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांसमोर साडेतीन मिनिटे चाललेल्या थरारानंतर इम्रान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) या तरुणाची धारदार शस्त्राने क्रूर हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, त्या वेळी परिसरात पोलिस पथकाची गस्त सुरू असतानाच हल्लेखोरांनी धक्कादायक निर्घृणता दाखवत इम्रानला रस्त्यावर घसडत नेत वार केले. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी क्षणार्धात दुकाने बंद केली तर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. मुख्य हल्लेखोर परवेज शेख (३६) व त्याचे सहकारी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान कुरेशी हा जमीन खरेदी–विक्रीसह अन्य छोट्या व्यवसायांत गुंतलेला होता. सोमवारी रात्री तो भाऊ इब्राहिमसोबत परवेज शेखच्या एस.एस. टेलिकॉम दुकानासमोर गेला होता. तेथे अंडा–भूर्जी खाल्ल्यानंतर इम्रान दुकानासमोर उभा असताना जुन्या वादावरून त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. वाद काही क्षणांतच हाणामारीत परिवर्तित झाला आणि दुकानाची तोडफोडही झाली. संतप्त परवेज आणि त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. गळा, कान आणि पोटावर प्राणघातक वार करण्यात आले. रक्तबंबाळ झालेला इम्रान जमिनीवर कोसळल्यानंतरही हल्लेखोरांनी त्याला रस्त्यावर ओढत नेत मारहाण सुरूच ठेवली. हा भयावह प्रकार पाहतही कोणीही हल्लेखोरांना थोपवण्यास पुढे आले नाही.
घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी तत्काळ दुकाने बंद केली तर रिक्षा स्टँडवरील चालकांनी वाहनांसह पळ काढला. बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. मृताचे नातेवाईक आणि मित्रांच्या वाढत्या उपस्थितीमुळे दंगा काबू पथक व शीघ्रकृती दल तैनात करण्यात आले. तरीही जमावावर नियंत्रण ठेवणे पोलिसांना कठीण जात होते.
दरम्यान, हल्लेखोरांच्या नातेवाईकांच्या घराजवळ काही अज्ञातांनी दगडफेक करत रिक्षा, कार व दुचाक्यांची तोडफोड केल्याचे समजते. पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. इम्रानला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. इब्राहिम गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. शहरात आधीच सुरक्षा सतर्कता असताना भररस्त्यात हत्या घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*