छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर असताना घराजवळ खेळत असलेली पाच वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार सिटी बांधकाम प्रकल्प परिसरात घडली. बुधवारी उशिरापर्यंत मुलीचा थांगपत्ता लागलेला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून, तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
मध्यप्रदेशातील सेंधवा येथील राम चव्हाण हे आपल्या कुटुंबासह कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आले आहेत. ते सध्या ओंकार सिटी बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी चव्हाण दाम्पत्य कामात व्यस्त असताना त्यांची पाच वर्षांची मुलगी राशी इतर मजुरांच्या मुलांसोबत इमारतीजवळ खेळत होती. काही वेळानंतर वडील राम चव्हाण खाली आले असता राशी दिसली नाही. त्यांनी इतर मुलींना विचारले असता त्यांनाही काही सांगता आले नाही.
याप्रकरणी घाबरलेल्या चव्हाण दाम्पत्याने तत्काळ चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे आणि पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पिसादेवी, पळशी परिसरासह आजूबाजूचा भाग पिंजून काढला. अग्निशमन दलाच्या मदतीने जवळील नाले, तलाव आणि इमारतींचे परिसरही तपासण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) तत्काळ तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चार स्वतंत्र पथके मुलीच्या शोधासाठी तयार करण्यात आली असून इतर जिल्ह्यांनाही मुलीच्या बेपत्ता होण्याची माहिती देण्यात आली आहे. “लहान मुलींसोबत खेळणाऱ्या इतर बालकांना काय घडले हे समजले नाही. तरीही आम्ही कसोशीने शोधमोहीम सुरू ठेवली असून गुरुवारपर्यंत आणखी कर्मचारी शोधात सहभागी होतील,” अशी माहिती पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*