छत्रपती संभाजीनगरातील पैठण गेट परिसरात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या तरुणाच्या खुनाच्या प्रकरणानंतर संबंधित आरोपींच्या दुकानांवर अतिक्रमण आणि विना परवानगी बांधकाम केल्याच्या तक्रारींना वेग आला आहे. मंगळवारी (दि.११) नागरिकांनी झोन क्रमांक २ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत या दुकानदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यानंतर महापालिकेने तातडीने नोटीस देत बांधकाम परवानगीसह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पैठण गेट परिसरातील अतिक्रमणांची सखोल तपासणी करून संबंधित रस्ते मुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी (दि.१३) टोटल स्टेशन सर्व्हे सुरू करण्यात आला. नगर रचना विभागाचे अभियंता राहुल मालखरे, उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे व इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या उपस्थितीत सर्वेक्षण पार पडले. या सर्व्हेत पैठणगेट ते सिल्लेखाना चौक, पैठणगेट ते सब्जीमंडी आणि पैठण गेट ते खोकडपुरा या तीन महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.

विकास आराखड्यानुसार पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता ३० मीटर, पैठणगेट ते सब्जीमंडी ६ मीटर तर पैठणगेट ते खोकडपुरा हा रस्ता १५ मीटर रुंदीचा असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी दुकाने व विविध व्यवसायांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. काही दुकानदारांनी विना परवानगी बांधकाम उभारल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या सर्व्हेनंतर कोणत्या मालमत्ता रस्त्याच्या विस्तारात बाधित होतील, हे लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मनपा लवकरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार असून शनिवारी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “पैठणगेट परिसरात अनेक दुकाने रस्त्यावर आहेत. लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल,” असे अतिक्रमण हटाव नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,152 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क