छत्रपती संभाजीनगर : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी खेळता खेळता अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी आणि कामगारांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा थांगपत्ता लागत नव्हता. तात्काळ चिकलठाणा पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली. परिसरातील विहिरी, तलाव, उजाड जागा, बांधकाम परिसरातील प्रत्येक कोपरा तपासण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले, मात्र पोलिसांना कोणताही ठसा मिळत नव्हता.

दरम्यान, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि डीवायएसपी पूजा नागरे यांनी शोधमोहीमेवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक सूचना दिल्या. चिकलठाणा पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके रात्रंदिवस तपास करत होती. अखेर शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास पळशी रोडवरील पारदेश्वर मंदिराजवळ ३० फूट आत ढाकणे यांच्या शेतातील अडगळीच्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला.

उपनिरीक्षक पारदे यांनी अग्निशमन दलाला माहिती देताच जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत लांडगे, राजू राठोड, लालचंद दुबेले आदी जवानांनी मृतदेह बाहेर काढून तो चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिला. नंतर चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. मृतदेहावरील कपडे आणि शूज जशास तसे असल्याने तिच्या मृत्यूमागील कारणांबाबत विविध संशय व्यक्त होत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राशीला पेरू खाण्याची आवड असल्याने ती शेतात पेरू आणायला गेली असावी, अशी शक्यता नातेवाइकांनी व पोलिसांनी वर्तवली. मात्र सर्व अंगाने तपास सुरू असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,012 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क