जिल्ह्यातील सहा नगर परिषद आणि एक नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला गति मिळाली असून चौथ्या दिवशी एकूण ३८ अर्ज दाखल झाले. यामध्ये अध्यक्षपदासाठी ४ आणि सदस्यपदासाठी ३४ अर्जांचा समावेश आहे. यापूर्वी दाखल झालेल्या ५ अर्जांसह एकूण अर्जांची संख्या आता ४१ वर पोहोचली आहे. उमेदवारांना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
या निवडणुकीत वैजापूर, सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद या सहा नगर परिषदांसह फुलंब्री नगर पंचायतीचा समावेश आहे. सात नगराध्यक्षांची थेट निवड आणि एकूण १६० नगरसेवकांची निवड यामार्फत होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून प्रारंभीचा प्रतिसाद पाहता राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण झालेली दिसत आहे.
अध्यक्ष पदासाठी कन्नड, पैठण, वैजापूर आणि फुलंब्री येथून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. तर सदस्यपदासाठी कन्नडमधून ६, पैठणमधून ११, वैजापूरमधून १७ अर्ज सोमवारपर्यंत दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत अर्जांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे, कारण अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षीय चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून नामनिर्देशन दाखल करण्यासाठी अजूनही चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत राजकीय हालचाली अधिक वेग घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*