छत्रपती संभाजीनगर : आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी प्रशासनाने गतीने सुरू केली असून गुरुवारी (दि. २०) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार शहरातील २९ प्रभागांत एकूण ११५ नगरसेवक निवडले जाणार असून ११ लाख १८ हजार ११८ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ५ लाख ७४ हजार ९३३ पुरुष मतदार, ५ लाख ४३ हजार ९९ महिला मतदार आणि ८६ इतर (थर्ड जेंडर) मतदारांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने पूर्वी ४ नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर ही नवी तारीख देण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे विलंब होत अखेर २० नोव्हेंबर रोजी ही यादी उपलब्ध करून देण्यात आली. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सुरक्षा कॅबिनजवळ तसेच सर्व झोन कार्यालयांत नागरिकांना यादी पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.

मतदारांनी आपल्या नावाची नोंद योग्य प्रभागात झाली आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जर नाव चुकीच्या प्रभागात असल्यास किंवा नाव वगळलेले असल्यास संबंधितांना आक्षेप व हरकती दाखल करण्याची संधी राहणार आहे. यासाठी नागरिक २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतील. गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिवही सदस्यांच्या वतीने हरकती नोंदवू शकतात. मात्र एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात अर्ज न स्वीकारण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त विकास नवाळे यांनी दिली.

यादीनुसार प्रभाग क्रमांक ५ आणि २६ मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ५१ हजार ७५४ मतदार आहेत. तसेच ११ प्रभागांमध्ये मतदारसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त असून १६ प्रभागांत ती ३० हजारांवर आहे. येणाऱ्या काळात नव्या प्रभागरचनेनुसार निवडणूक रंगणार असून प्रशासन ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य वेळेत पडताळणी करून लोकशाहीतील सहभाग निश्चित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,419 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क