छत्रपती संभाजीनगर : नगर परिषद व नगरपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अधिक उकळी आली आहे. एकूण ८२० वैध अर्जांपैकी तब्बल १६१ उमेदवारांनी माघार जाहीर केल्याने आता ६५९ उमेदवार निवडणूक रिंगणात ठामपणे उभे राहणार आहेत. यामध्ये ४२ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर ६१७ इच्छुक सदस्य पदासाठी जनतेचा कौल मिळवण्यासाठी तयारीला लागले आहेत.

जिल्ह्यातील ६ नगर परिषद व १ नगरपंचायत निवडणुकांसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत १४०१ अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान ४५२ अर्ज अवैध ठरले. वैध अर्जांची संख्या अध्यक्ष पदासाठी ५४ आणि सदस्य पदासाठी ७६६ अशी होती. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत अनेकांच्या समीकरणांमध्ये उलथापालथ झाली. राजकीय दबाव, आंतरकलह, पक्षांतर अशा विविध कारणांमुळे मोठ्या संख्येने उमेदवारांनी स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात काही उमेदवारांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून २६ नोव्हेंबरपर्यंत निकाल अपेक्षित आहे. यानंतरच काही मतदारसंघांमध्ये अंतिम लढत कोणामध्ये होणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण तारखा जाहीर केल्या असून, २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीचा जल्लोष ग्रामीण भागात ओसंडून वाहताना दिसत आहे. उमेदवार घरदारीत जाऊन जनसंपर्क साधत असून, बाजारपेठा, शेत, सामाजिक कार्यक्रम या सर्व ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. ‘गुलाल उडणार तर तो आपलाच’ अशी महत्त्वाकांक्षा अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचंड चुरशीच्या होण्याची चिन्हे आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

573 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क