छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला असून फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तसेच पैठण, वैजापूर आणि गंगापूर नगरपरिषद क्षेत्रातील एकूण आठ प्रभागांतील निवडणूकही थांबवण्यात आली आहे. न्यायालयीन अपिलांचे निकाल प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ऋषीकेश भालेराव यांनी दिली. या निर्णयामुळे उमेदवारांचा हिरमोड झाला असून अनेकांनी प्रचारावर केलेला खर्च वाया गेल्याची भावना व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड आणि वैजापूर या सहा नगरपरिषदा तसेच फुलंब्री नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या ठिकाणी 2 डिसेंबर रोजी थेट पद्धतीने सात नगराध्यक्ष आणि 160 सदस्यांची निवड होणार होती. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधीच काही प्रभागातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
वैजापूर येथील प्रभाग क्रमांक 1 ‘अ’ आणि 2 ‘ब’, गंगापूर येथील प्रभाग 4 ‘ब’ आणि 6 ‘ब’, तर पैठणमधील 3 ‘अ’, 6 ‘अ’, 6 ‘ब’ आणि 11 ‘ब’ या प्रभागांतील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूकच रद्द केल्यामुळे तेथील सर्वच उमेदवारांना धक्का बसला आहे. संबंधित प्रभागांव्यतिरिक्त उर्वरित ठिकाणी 2 डिसेंबर रोजी नियोजितप्रमाणे मतदान होणार आहे.
स्थगित निवडणुकांसाठी नवीन कार्यक्रम 4 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यानुसार, 10 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. 11 डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. तर 20 डिसेंबर रोजी मतदान घेऊन 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल.
न्यायालयीन अपील प्रलंबित असल्यामुळे निवडणूक आयोगाला काही प्रभागांतील प्रक्रिया स्थगित करावी लागली असून पुढील कार्यवाही नियमांनुसार करण्यात येणार आहे, असे भालेराव यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*