छत्रपती संभाजीनगर : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा असल्याची कठोर प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना आयोगावर निशाणा साधत हा निर्णय कायद्याचा चुकीचा अर्थ लावल्याने झाल्याचा आरोप केला.

फडणवीस म्हणाले, “एखादा व्यक्ती कोर्टात जातो म्हणून संपूर्ण निवडणुका पुढे ढकलणे हे अत्यंत चुकीचे आहे. निवडणूक आयोग नेमका कोणता कायदा पाहतोय किंवा कुणाचा सल्ला घेतोय, याची काही कल्पना नाही. मात्र माझ्या अभ्यासानुसार आणि अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चेनंतर हे स्पष्ट होते की अशा कारणावरून निवडणुका स्थगित करणे योग्य नाही. आजवर असा प्रकार कधीही झाला नाही.” त्यांनी स्पष्ट केले की आयोग स्वायत्त असला तरी त्याच्या निर्णयाचा परिणाम प्रामाणिकपणे प्रचार करणाऱ्या उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे ते सांगू इच्छितात.

“उद्या निवडणूक आणि आजच ती पुढे ढकलणे हा उमेदवारांवरील अन्याय आहे. महिनाभर मेहनत घेऊन प्रचार केलेल्या उमेदवारांचे परिश्रम वाया गेले. आता १५-२० दिवसांनंतर पुन्हा नव्याने प्रचार करावा लागणार आहे. हे व्यवस्थित नाही,” असे फडणवीस म्हणाले.

सरकार या निर्णयाविरोधात निवडणूक आयोगाकडे अधिकृतरित्या सादरीकरण करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे, हे सरकार आयोगाला ठोसपणे सांगेल,” असे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

889 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क