छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज (दि. २) कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदारांनी मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रात पोलीस तैनाती वाढवण्यात आली असून संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.
निवडणूक तयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी (दि. १) ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, सहायक आयुक्त नगरपालिका प्रशासन हृषिकेश भालेराव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी शेळके तसेच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड हे ऑनलाईन उपस्थित होते. सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देखील आपापल्या हद्दीतील स्थितीची माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यावर विशेष भर दिला. वैजापूर नगरपरिषद हद्दीतील २५ जणांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक दिवसासाठी तडीपार करण्यात आले आहे. संवेदनशील केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुबार मतदान होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून दुबार मतदारांच्या नावासमोर विशेष चिन्ह करण्यात आले आहे. तसेच अशा मतदारांशी संपर्क साधून ते कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहेत, याची नोंद फॉर्मद्वारे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दुबार मतदार फक्त एकाच ठिकाणी मतदान करेल, याची खात्री प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी एकूण २ लाख ३४ हजार १६३ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख १८ हजार ९७५ पुरुष, १ लाख १५ हजार १७३ महिला, तसेच १५ इतर मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. या मतदारांसाठी २४८ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये फुलंब्री नगरपरिषद क्षेत्रातील मतदारांचा समावेश नसून फुलंब्रीतील १७ हजार ८३० मतदार २० डिसेंबर रोजी मतदान करणार आहेत.
जिल्ह्यातील सिल्लोड, वैजापूर, पैठण, कन्नड, गंगापूर आणि खुलताबाद या नगरपरिषद क्षेत्रांमध्ये सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून प्रशासनाने सर्व विभागांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. शांततेत आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*