छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ वादाची काही ठिकाणी नोंद झाली असली तरी एकूण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. जिल्ह्यात सरासरी ७४.७० टक्के मतदान झाले असून खुलताबाद नगरपरिषदेस सर्वाधिक ८२.२६ टक्के मतदारांनी मतदान करून आघाडी घेतली. तर गंगापूरमध्ये सर्वात कमी ७१.७६ टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदानानंतर सहा नगराध्यक्ष आणि १३५ नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
जिल्ह्यातील वैजापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद आणि गंगापूर या सहा नगरपालिकांमध्ये सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. काही ठिकाणी वेळ संपल्यानंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावू शकला. प्रशासनाच्या माहितीनुसार कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततापूर्ण आणि शिस्तबद्धरीत्या पार पडल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण २ लाख १६ हजार ७८९ मतदार असून त्यांच्यासाठी २४८ केंद्रांवर उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सकाळच्या थंडीतही अनेक केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वीच रांगा लागल्या होत्या. सुरुवातीच्या दोन तासांत सरासरी ९.२७ टक्के मतदान झाले होते; मात्र पुढील काही तासांत मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी ११ वाजेपर्यंत मतदान २२.९१ टक्क्यांपर्यंत पोहोचले तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ३८.६३ टक्क्यांपर्यंत नोंद झाले. सिल्लोड व खुलताबाद येथे दुपारीच ६० टक्के मतदानाचा टप्पा पार झाला होता.
मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याची काही प्रकरणेही समोर आली. सिल्लोडमध्ये ३, पैठणमध्ये ४ तर कन्नडमध्ये ४ बॅलेट युनिट बदलण्यात आले. तसेच कन्नडमध्ये एक कंट्रोल यूनिटही बदलावे लागले. मतदानात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने त्वरित मशीन बदलून मतदान सुरळीत सुरू ठेवले.
मतदानावर नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि सहायक आयुक्त ऋषिकेश भालेराव यांनी सातत्याने नजर ठेवली. प्रत्येक नगरपालिकेची मतदान टक्केवारी रिअल-टाईम अपडेट होत होती.
मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असून त्यासाठी स्ट्राँग रूम परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे, २४ तास पोलीस बंदोबस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली मतपत्रिकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकांवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून निकालासाठी नागरिकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*