छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. बुधवारी (दि. ३) आक्षेप नोंदविण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ७ हजार ५६७ आक्षेप दाखल करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मनपाने २९ प्रभागांची मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, प्रभागनिहाय याद्या जाहीर होताच याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे उघड झाले. जिल्हा प्रशासनाने मनपाला दिलेल्या अहवालानुसार, या याद्यांमध्ये सुमारे ५८ हजार दुबार मतदार असल्याचे समोर आले. तसेच एका प्रभागातील मतदारांना दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आल्याच्या तक्रारींनी वातावरण तापले.

या घोळामुळे नागरिकांकडून आक्षेप नोंदविण्याची गर्दी होत असतानाच राजकीय पक्षांनी देखील आक्षेप दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. त्यानुसार आयोगाने मुदत २७ नोव्हेंबरवरून ३ डिसेंबरपर्यंत वाढवली. वाढीव मुदतीतही हजारोंच्या संख्येने आक्षेप दाखल झाले.

दरम्यान, मंगळवार (दि. २) पर्यंत दाखल झालेल्या आक्षेपांपैकी २४४५ आक्षेप निकाली काढण्यात आले आहेत. प्राधिकृत अधिकारी, प्रगणक आणि बीएलओ यांची नियुक्ती करून स्थळपाहणीच्या माध्यमातून आक्षेपांची तपासणी सुरू आहे.

राज्य निवडणूक आयोगानुसार, नोंदवलेल्या आक्षेपांची छाननी पूर्ण करून १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर होईल. तर २२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रदर्शित केली जाणार आहे.

सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील २९ प्रभागांत मिळून ११ लाख १८ हजार ११८ मतदार आहेत. ११५ सदस्यसंख्येनुसार प्रत्येक प्रभागात चार सदस्यांचा समावेश आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

448 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क