छत्रपती संभाजीनगर : बसमधील गर्दीत माणुसकीचा हात पुढे करून कडेवर बाळ असलेल्या महिलेच्या सोयीसाठी जागा देणे एका वृद्धेला चांगलेच महागात पडले. बाळाचे खेळणे पडल्याचा बहाणा करीत चार महिलांच्या टोळीने तिच्याकडून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) सकाळी १० वाजेच्या सुमारास बीडकीन ते हर्सूल टी-पॉइंट या बस प्रवासादरम्यान घडली. या प्रकरणी चार अज्ञात महिलांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपासासाठी तो हर्सूल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी श्रीकांत झिरपे यांच्या पत्नी मीनाबाई झिरपे त्या दिवशी शेवगाव येथून संभाजीनगरकडे प्रवास करत होत्या. बिडकीन येथे बस थांबल्यावर त्यांच्या मागील आणि शेजारच्या सीटवर चार महिला येऊन बसल्या. त्यातील एकीच्या कडेवर लहान बाळ होते. गर्दीचा विचार करून आणि माणुसकीच्या नात्याने मीनाबाईंनी त्या महिलेला शेजारची जागा दिली. काही वेळातच बाळाचे खेळणे पडल्याचे कारण सांगत ती महिला खाली वाकली आणि या हालचालीत तिने मीनाबाईंची बॅग हळूच मागे ढकलली.
याबाबत मीनाबाईंनी संशय व्यक्त करत त्या महिलेला प्रश्न विचारला; मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. बॅग पाठीमागे सरकल्यानंतर मागील सीटवर बसलेल्या तिच्या साथीदार महिलांनी बॅग उघडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने पळवले. पुढे संभाजीनगरात मुलीच्या घरी पोहोचताच मीनाबाईंना बॅगमधील स्टीलचा डब्बा दिसत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. तपासात बॅगमधील ८ तोळे सोने चोरीला गेल्याची खात्री झाली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*