आँनलाईन गेमच्या नावाखाली अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत मोठ्या प्रमाणावर जुगाराचे व्यवहार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाईत जेरबंद केले. करमाड पोलीस ठाणे हद्दीतील कुंभेफळ येथे ही कारवाई करण्यात आली असून नऊ आरोपींना अटक करून आठ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, ड्रीम सिटी सोसायटी, रो हाऊस क्र. १४, कुंभेफळ येथे काही इसम ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून जुगार रॅकेट चालवत आहेत. लोकांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारून त्यांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिससह विविध खेळांवरील बेटिंगमध्ये सहभागी करून घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तत्काळ सापळा रचण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छापा टाकण्यात येताच तेथे नऊ जण लॅपटॉप, मोबाईल, टॅब आणि विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून जुगार खेळताना आणि खेळविताना आढळले. प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोपी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील विभिन्न भागातील असल्याचे समोर आले. आरोपींमध्ये सुरज पचलोरे, प्रणव मानकर, राहूल डनसेना, सुरत यादव, रोहन बिशमकुमार, शहादाब खान, महेंद्र नवग्रह, प्रतीक मोरे आणि सौरभ महाले या नऊ जणांचा समावेश आहे.

या ठिकाणाहून एकूण ५ लॅपटॉप, १ टॅब, २२ मोबाईल फोन, ६ सिमकार्ड, ४ क्यूआर स्कॅनर, २१ विविध बँकांचे डेबिट–क्रेडिट कार्ड, मोटारसायकल तसेच ३५,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी चौकशीत सांगितले की, हे संपूर्ण जुगार नेटवर्क बाहेरील राज्यातील त्यांच्या साथीदारांमार्फत चालविले जात होते आणि ते फक्त ऑपरेटर म्हणून काम करत होते. लोकांना गेमिंगद्वारे मोठा पैसा जिंकण्याचे आमिष दाखवून त्यांना फसवण्याचा हा प्रकार बराच काळ सुरू होता.

स्थानीय गुन्हे शाखेने आरोपींना मुद्देमालासह करमाड पोलीस ठाण्यात हजर केले असून बनावट व्यवहार, फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि जुगार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत या रॅकेटचा धागा आंतरराष्ट्रीय स्तरावरील जुगार टोळीशी जोडला गेलेला असल्याची शक्यता समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संतोष मिसळे, पवन इंगळे, उपनिरीक्षक महेश घुगे, दिलीप चौरे, पोह. विठ्ठल डोके, सचिन सोनार, रविंद्र लोखंडे, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल चव्हाण, निलेश कुडे यांच्यासह सायबर विभागाचे अधिकारी गणेश घोरपडे, योगेश मोईम, राजेश राठोड यांनी संयुक्तरीत्या केली. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले ऑनलाईन जुगार रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,764 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क