छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नियमभंगाला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षा चालकांविरुद्ध मोठी मोहीम राबवत कठोर कारवाई केली. वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या आणि उध्दट वर्तन करणाऱ्या एकूण ७९७ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल ९,६६,४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी ३,६७,००० रुपये दंड तत्काळ वसूल करण्यात आला आहे. तसेच वाहतूक नियमांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या ३२ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.
काल (दि. २३ नोव्हेंबर) महावीर चौकात वाहतूक नियमन करत असताना एका रिक्षा चालकाने जाणूनबुजून वाहतूक अंमलदाराच्या अंगावर रिक्षा चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या गंभीर प्रकारामुळे पोलीस विभाग सतर्क झाला असून संबंधित चालकाविरुद्ध वेदांनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर तत्काळ एक्शन मोडमध्ये जात वाहतूक विभागाने आज (२४ नोव्हेंबर) ही धडक मोहीम राबवली. पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) श्री. सुभाष भुजंग यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ही कारवाई केली.
शिस्तप्रिय आणि नियमांचा आदर करणाऱ्या रिक्षा चालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. ही मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याचेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
या संपूर्ण मोहिमेत पोलीस आयुक्त मा. विरेंद्र मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक व उपशाखांतील अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*