छत्रपती संभाजीनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असताना महावीर चौक परिसरात रविवारी दुपारी घडलेली घटना शहराला हादरवून गेली. थांबण्याचा इशारा करताच एका मुजोर रिक्षाचालकाने वाहतूक पोलिस अंमलदार तुकाराम टाकसाळे (वय ३६) यांना थेट धडक दिली. केवळ धडक देऊन थांबला नाही, तर अंगावरून रिक्षा घालत त्यांना जवळपास २० फुटांपर्यंत फरफटत नेत चिरडले. एक चाक चेहऱ्यावरून तर दुसरे चाक पोटावरून गेल्याने त्यांच्या चेहरा, कान, पाठ, हात-पाय आणि बरगडीला गंभीर दुखापत झाली आहे. सद्यस्थितीत त्यांच्यावर सिग्मा रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना बाबा चौकाकडून पंचवटी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिस चौकीसमोर दुपारी १ वाजता घडली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान विनागणवेश रिक्षा (MH20-EK-4632) वेगाने जाताना दिसताच अंमलदार टाकसाळे यांनी थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने उलट अधिक वेग घेत थेट अंमलदारांना चिरडलं.

धडक दिल्यानंतर आरोपी युसूफ मोहंमद अली अन्सारी (रा. मोमिनपुरा मशिदीजवळ, दौलताबाद) सुसाट वेगाने पसार झाला. त्याचवेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला असताना त्याने एका दुचाकीस्वारालाही उडविले. एवढ्यावरच न थांबता वळणावर तीव्र टर्न घेताना त्याच्या रिक्षातील तीन प्रवाशांपैकी एक प्रवासी रस्त्यावर पडला तरीही तो थांबला नाही. या दरम्यान पोलिसांनी चालकाचा चेहरा आणि रिक्षा क्रमांक टिपून ठेवल्याने आरोपी ओळखला गेला.

फक्त दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी याच अन्सारीने रेल्वे स्टेशन परिसरात एका वर्ग-२ महिला अधिकाऱ्याची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करताना पोलिसांशी हुज्जत केली व मारहाणही केली होती. या प्रकरणात अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाल्याने आरोपीची हिंमत अधिक वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या घटनेमुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न आणखी गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. गणवेश नसलेल्या वाहनचालकांची तपासणी कठोर करण्याबाबत पोलिसांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

वेदांतनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथक वेगाने काम करत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,665 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क