छत्रपती संभाजीनगर : गंगापूर-गंगापूर फाटा दरम्यान सोमवारी (दि.२४) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पित्याचा गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत. पैठण तालुक्यातील शेकटा येथील जाधव कुटुंबावर या घटनेने शोककळा पसरली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या बालकांची नावे विराट प्रदीप जाधव (वय ५) आणि खुशी प्रदीप जाधव (वय ३) अशी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रदीप रमेश जाधव (३५) हे आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन दोनचाकीवरून (एमएच १६ एझेड ७७६५) महालगाव येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपून परत येत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गंगापूर-गंगापूर फाटा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर अचानक भरधाव वेगात येणाऱ्या आयशर वाहनाने (एमएच २५ एजे ७४०२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा वेग एवढा प्रचंड होता की दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने विराट आणि खुशी यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे वडील प्रदीप जाधव गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर आयशर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही अंतरावर वाहन थांबवून तो फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गंगापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपी वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोन निष्पाप चिमुकल्यांचे असे अकाली निधन झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासन आणि नागरिकांकडून पुन्हा एकदा जागरूकतेचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*