छत्रपती संभाजीनगर : पोक्सो आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असताना घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेला आरोपी सोहेल अब्दुल रज्जाक कादरी (२७, रा. विश्रांतीनगर) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मंगळवारी सायंकाळी तो आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी शहरात आला असताना गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात तो सापडला. फेब्रुवारीपासून तो फरार होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकार यांनी दिली.

मे २०२४ मध्ये शहरातील एका अल्पवयीन मुलीला मदतीचे आमिष दाखवून सोहेलने तिला हॉटेलमध्ये नेले होते. तिला गुंगीचे औषध देत तिन्ही दिवस विविध ठिकाणी बलात्कार केला. या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती, मात्र वारंवार त्याचा जामीन नाकारला गेला. आठ फेब्रुवारी २०२५ रोजी नियमित तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेल्यानंतर त्याने पोलिसांना धक्का देत पळ काढला. तेव्हापासून तो बेपत्ता होता.

फरारी झाल्यानंतर सोहेल मुंबईला जाऊन एका मांस विक्रेत्याकडे नोकरी करू लागला होता. दरम्यान, मंगळवारी तो आपल्या आजारी आईला भेटायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक संदीप काळे आणि अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड, विजय निकम, बाळू नागरे यांनी चंपा चौक परिसरात जाळे लावले. सायंकाळी ६.३० वाजता हॉस्पिटल बाहेर पोहोचताच पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

अटक होताच सोहेलने पोलिसांशी अरेरावी केली. हे पाहून क्षणात शेकडोंचा जमाव जमला. जमावाच्या उपस्थितीत त्याची दादागिरी वाढू लागली आणि त्याने पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. परिस्थिती ताणली जाऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांची वाट न पाहता जमावातून वाट काढत त्याला पायीच ठाण्यात नेले.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी परत जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,981 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क