छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात संशोधक आणि महाविद्यालयीन प्राध्यापक ज्ञानेश्वर तुकाराम शिरसाट (३७, रा. विद्युत कॉलनी) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची चार वर्षांची मुलगी गंभीर अवस्थेत दाखल आहे. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विद्यापीठातील वसतिगृहात भाचीला सोडून परत जात असताना हा अपघात घडला. अतिवेगाने समोरून येणाऱ्या कारचालकाने (क्र. एमएच २० एचएच ८२५२) नियंत्रण गमावून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही हवेत उडत दूर जाऊन पडले. घटनास्थळीच ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाला, तर मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.
हसनापूर (ता. अंबड) येथील शेतकरी कुटुंबातील ज्ञानेश्वर हे एका खासगी महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. अत्यंत हुशार म्हणून त्यांची ओळख असून अर्थशास्त्रातील पीएच.डी.चे शिक्षण ते पूर्ण करत होते. कौटुंबिक कारणास्तव ते पत्नी आणि मुलीसह विद्युत कॉलनीत राहत होते. त्यांची भाची विद्यापीठात शिक्षण घेत असून बुधवारी ती मामाच्या घरी आली होती. रात्री भाचीला वसतिगृहात सोडून परतताना हा अपघात झाला.
दरम्यान, कारचालक शेख करीम शेख (३९, रा. कुंभार गल्ली, बेगमपुरा) याला बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने ही कार अवघ्या चार दिवसांपूर्वीच खरेदी केली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
गर्भवती पत्नीची काळजाला ठसठसणारी प्रतीक्षा
घटनेच्या वेळी ज्ञानेश्वर यांची पत्नी गर्भवती असल्याने त्या घरीच थांबल्या होत्या. रात्री पती आणि मुलगी परत येण्याची वाट पाहणाऱ्या त्यांच्या पत्नीला हा अपघात कसा सांगावा असा भावनिक प्रश्न नातेवाइकांसमोर निर्माण झाला. बातमी कळताच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात गर्दी केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*