अहिल्यानगर जिल्ह्यात एका २९ वर्षीय तरुण शेतकऱ्याची लग्नाच्या आमिषाने मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘स्त्रीधन’ म्हणून ३ लाख रुपये उकळल्यानंतर नवरी म्हणून आणलेली मुलगी रस्त्यातच कारमधून उतरून दुसऱ्या कारमध्ये बसून फरार झाली. संपूर्ण कट हा पूर्वनियोजित असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या तरुणाचा विवाहासाठी शोध सुरू असल्याची माहिती मिळताच रस्त्याच्या कामावरील सुपरवायझर अरविंद राठोड याने त्याच्याशी संपर्क साधला. ‘आमच्या गावाकडे चांगले स्थळ आहे’ असे सांगून त्याने तरुणाचा विश्वास संपादन केला. माया शिंदे नावाच्या मुलीचा फोटो दाखवून ‘मुलीला वडील नाहीत, ती आई–भावासोबत राहते आणि कंपनीत नोकरी करते’ अशी माहिती देण्यात आली. मुलगी पसंत पडल्यावर लग्नासाठी थेट ३ लाख रुपये ‘स्त्रीधन’ म्हणून देण्याची अट ठेवली गेली.

३० नोव्हेंबर रोजी बजाजनगर येथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही बाजूंनी पसंती दर्शवल्यानंतर छत्रपती संभाजीनगर न्यायालयात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर उभयतांच्या संमतीने लग्न करण्याची नोटरी करण्यात आली. नोटरी केल्यामुळे तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे ३ लाख रुपये मायाची आई सविता शिंदेला देण्यात आले.

यानंतर नवरीला घेऊन तरुणाचे कुटुंबीय घरी निघाले. काही अंतरानंतर अचानक पांढऱ्या रंगाची विनाक्रमांकाची आय-20 कार त्यांच्या पुढे येऊन आडवी उभी राहिली. गाडीतून चार अज्ञात व्यक्ती बाहेर आले. त्याच क्षणी नवरी माया कारमधून उतरली आणि आडव्या लावलेल्या कारमध्ये बसली. काही क्षणांत ती कार वेगाने निघून गेली. धक्क्यातून सावरल्यावर तिचा फोन लावला असता तो बंद होता. तिच्या घरी जाऊन पाहिले असता तेथेसुद्धा कुणी नसल्याचे समोर आले.

या फसवणुकीची जाणीव होताच तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अरविंद राठोड, बुड्डा राठोड, सविता शिंदे आणि माया शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,851 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क