छत्रपती संभाजीनगर : सुराणानगर परिसरात राहणाऱ्या व्यावसायिक दांपत्याच्या घरातून तब्बल १० तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संशयित आरोपी या घरकाम करणाऱ्या मोलकरणीच असल्याचे जिन्सी पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हा प्रकार ७ ते १७ नोव्हेंबरदरम्यान घडला.
सविता घोरपडे (४०) आणि सुनिता सोनवणे (४५, दोघी रा. बायजीपुरा) अशी संशयितांची नावे आहेत. रुपाली अमोल बाटिया या कुकिंगचे खासगी क्लास चालवतात, तर त्यांच्या पतीचे मोंढ्यात पान मसाल्याचे होलसेल दुकान आहे. दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून दोन्ही मोलकरणी घरी कोणी नसताना काम करून जात होत्या. घरकामासाठी बाहेर चावी ठेवण्याची पद्धतही होती.
यादरम्यान, अडीच तोळ्यांच्या बांगड्या, तीन तोळ्यांचा नेकलेस, दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि तीन तोळ्यांची चेन असा मिळून १० तोळ्यांचा सोन्याचा ऐवज घरातून गायब झाला. चोरी लक्षात आल्यानंतर रुपाली यांनी सासू आणि मोलकरणींना विचारले, मात्र कोणीही माहिती न दिल्याने त्यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, घरमालकांच्या मोठ्या निष्काळजीपणाचा तपासात उलगडा झाला आहे. ज्या लॉकरमध्ये दागिने ठेवले होते, त्याची चावीही घरातील चावीच्या जवळच ठेवण्यात आली होती. यामुळे चोरी करणे संशयितांसाठी अधिक सोपे झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मोलकरणींची चौकशी सुरू असून त्यांच्या हालचाली आणि गेल्या काही दिवसांतील वर्तनाचा तपास करण्यात येत आहे. चौकशीअंती प्रत्यक्ष गुन्हा कोणी केला आणि चोरीमागील हेतू काय, हे स्पष्ट होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*