छत्रपती संभाजीनगर : शहरातील उत्सव चौक ते दशमेश नगर दरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेतून घरी परतत असलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीला अश्लील हातवारे करून छेडछाड करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीची ओळख अशोक यशवंत साळवे (वय ३५, रा. हिंदलाईन, उल्हासनगर, सध्या रा. गाडे चौक) अशी करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेय नगरमधील पाचवीत शिकणारी मुलगी तिच्या काही मित्र-मैत्रिणीसह दुपारी शाळेतून घरी परतत होती. त्याचवेळी आरोपी बराच वेळ त्या मुलांच्या मागे चालत असल्याचे दिसून आले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने मुलीकडे पाहत अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरले, मात्र आरोपीचा विटंबना इतक्यावरच थांबला नाही. त्याने शिवीगाळ करत मुलांना लाकडी दांडयाने मारहाण करण्याची धमकी दिली. यामुळे काही मुले भीतीने रडू लागली तर काहींनी मदतीसाठी आरडाओरड केली.

आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. संतापलेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देत आवरले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते आदित्य दहिवाल यांनी घटनास्थळी धाव घेत मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना धीर देऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला. पुढील तपास सहाय्यक महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल मंदा सामसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,921 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क