छत्रपती संभाजीनगर : शहरात लग्नाच्या आमिषाने फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोना काळात पत्नीचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्या राजस्थानमधील तरुणाला एजंट महिलेने 25 वर्षीय मुलीसोबत लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वेदांत नगर पोलिसांनी एका महिला एजंटला अटक केली असून तिच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो आढळले आहेत.
फसवणूक झालेला तरुण दिलीप कुमार देवराम सेन (वय 30, रा. सिरोई पीनवाडा, राजस्थान) हा मूळचा सलून व्यवसाय करणारा आहे. कोरोना काळात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने पुन्हा विवाहाचा निर्णय घेतला. या शोधात भावाच्या परिचयातून फिरोज आणि सलीम ही दोन व्यक्ती भेटली. त्यांनी 25 वर्षीय मुलीचे स्थळ सुचवून फोटो पाठवले. मुलगी पसंत पडल्याने त्यांनी नजमा वसीम खान (वय 50, रा. पडेगाव) या एजंट महिलेची भेट घडवून आणली.
नजमाने लग्न लावण्यासाठी 1 लाख 30 हजार रुपये घेण्याची अट घातली. दिलीप कुमार 8 डिसेंबर रोजी भाऊ व आईसोबत शहरात आला. नजमाने वानखेडे नगरमध्ये आदिती विठ्ठल जगताप (वय 25) नावाच्या मुलीची भेट घालून दिली. दोघांनी एकमेकांना पसंत केल्याने पुढच्या दिवशी मुलीच्या घरी साध्या पद्धतीने लग्न लावण्यात आले. नवरदेवाने राजस्थानला परत जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची सोय केली होती; मात्र नवरीने रेल्वेने जाण्याचा आग्रह धरला.
9 डिसेंबरला सर्वजण रात्री 11 वाजता मनमाड रेल्वे स्थानकावर पोहोचले. नवरी तिच्या मैत्रिणीसह होती. तब्येत बरी नसल्याचे सांगत तिने हॉटेलमध्ये खोली घेण्याचा हट्ट धरला. दिलीप कुमार खोली शोधत असताना नवरी आणि तिची मैत्रीण स्थानकातून गायब झाल्या. दोघींचा फोन बंद येत होता. त्यानंतर नजमाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिचाही नंबर बंद असल्याचे दिसले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलीप कुमारने वेदांत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी नजमाला अटक केली असून तिच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो मिळाल्याने आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*