छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगरातील नॉयलॉन मांजाच्या अवैध साठा व विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १५) रात्री मोठी धडक कारवाई केली. रांजणगाव, बजाजनगर, वडगाव कोल्हाटी तसेच शहरातील ढिंबारगल्ली बेगमपुरा या विविध भागांत एकाच वेळी छापे टाकत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे एकूण ३०० गट्टू नॉयलॉन मांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख ७० हजार रुपये आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात नॉयलॉन मांजाविरोधात कारवाई झाल्याने पतंग व मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी रुद्राक्ष संतोष बुरसे (रा. इंद्रप्रस्त कॉलनी, बजाजनगर), भागवत अंबादास जाधव (रा. जयभवानी नगर, म्हाडा कॉलनी), रोहन राजेंद्र ढेंगळे (रा. बजाजनगर), संदिप राजु डोईफोडे (रा. वडगाव कोल्हाटी) आणि राज विनोद जगताप (रा. ढिंबारगल्ली, बेगमपुरा) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

शहर गुन्हे शाखेच्या पथकाने प्रथम रांजणगावातील पुष्पनगरी येथील एका दुकानाच्या तळघरात छापा टाकला असता ५४ हजार ९०० रुपये किमतीचे ६१ गट्टू आढळून आले. त्यानंतर रुद्राक्ष बुरसे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नॉयलॉन मांजाचे तीन बॉक्स भागवत जाधव व एक बॉक्स राज जगताप यास विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी भागवत जाधव यांच्या स्वामी समर्थ किराणा दुकानावर छापा टाकत १ लाख २९ हजार ६०० रुपये किमतीचे १४४ गट्टू जप्त केले. पुढील कारवाईत रोहन ढेंगळे व संदिप डोईफोडे यांच्याकडून ७२ गट्टू (६४ हजार ८०० रुपये), तर राज जगताप याच्याकडून २३ गट्टू (२० हजार ७०० रुपये) असा एकूण ३०० गट्टू मांजा जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान हा मांजा मुदस्सीर ऊर्फ मुजीब अहमद नजीर अहमद व त्याचा भाऊ समीर अहमद नजीर अहमद यांच्या दुकानांतून खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील मांजा विक्रेते असून सुरत येथून ऑनलाइन पद्धतीने नॉयलॉन मांजा मागवून शहरात पुरवठा करीत असल्याचे समोर आले आहे. मुदस्सीरविरुद्ध यापूर्वी पाच गुन्हे दाखल असून यंदा त्याचा भाऊही रेकॉर्डवर आला आहे. या प्रकरणात त्यांनाही आरोपी करण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाथरकर करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,209 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क