छत्रपती संभाजीनगर : बसप्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या मौल्यवान दागिन्यांवर आता चोरट्यांची नजर असल्याचे सलग दोन घटनांमधून स्पष्ट झाले आहे. एका महिलेकडून चोरट्यांनी १० तोळ्यांचे दागिने लंपास केले, तर दुसऱ्या घटनेत सिडको बसस्थानकावर दोन महिला चोरांना नागरिकांनीच रंगेहात पकडत पोलिसांच्या हवाली केले.

पहिली घटना ६ डिसेंबर रोजी घडली. शास्त्रीनगरातील सुरेखा पाटील या नणंदेसोबत बसने प्रवास करत होत्या. फुलंब्रीजवळ बसमध्ये दोन संशयित महिला चढल्या. त्यापैकी एक सुरेखा यांच्या अगदी जवळ उभी राहिली. सावंगी फाट्यापर्यंतही तिने स्वतंत्र सीट उपलब्ध असूनही बसण्यास नकार दिला. मिल कॉर्नर येथे पोहोचताच दोन्ही महिला घाईघाईने उतरल्या. त्यानंतर रिक्षेत बसल्यानंतर सुरेखा यांनी पर्सची चैन उघडी आढळून पाहणी केली असता त्यातील दागिन्यांचा डबा गायब असल्याचे लक्षात आले. आरोपींनी ५ तोळ्यांचे मंगळसूत्र, ३.५ तोळ्यांचा वेल, ७ ग्रॅमची कानातली आणि ५ ग्रॅमची अंगठी असा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत सिडको बसस्थानकावर महिला चोरांची टोळी नागरिकांनीच पकडली. अर्चना खंदारे या ८ डिसेंबर रोजी सकाळी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६.३ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अश्विनी पोटे यांच्या गळ्यातील ४ ग्रॅमची पोत चोरण्याचा प्रयत्नही झाला. आरडाओरड झाल्यानंतर जमावाने दोन महिला चोरांना पकडून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांची तिसरी साथीदार फरार झाली असून तिचा शोध सुरू आहे.

या सलग घटनांमुळे बसप्रवासात विशेषतः महिलांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

656 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क