छत्रपती संभाजीनगर : शहरात नायलॉन व चायनीज मांज्याच्या अवैध विक्रीविरोधात शहर गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २८९ गट्टू नायलॉन मांज्या जप्त केला असून त्याची एकूण किंमत २ लाख १६ हजार ७५० रुपये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, पशुपक्षी तसेच पर्यावरणाला होणाऱ्या गंभीर धोक्याची दखल घेत पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर गुन्हे शाखेमार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. १९ डिसेंबर रोजी शहर गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत नायलॉन मांज्या विक्री होत असल्याची माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पडेगाव व सातारा परिसरात सापळा रचून संशयितांची झडती घेतली. या कारवाईत पहिला आरोपी संकेत दीपक कानडे (वय २६, रा. पडेगावनगर) याच्याकडून सातारा परिसरातील गोडाऊनमधून १ लाख ८ हजार रुपये किमतीचे १४४ गट्टू नायलॉन मांज्या जप्त करण्यात आले.

 

त्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी गोविंद साळुंके (रा. पडेगावनगर) याच्या राहत्या घराची झडती घेतली असता तेथून ९७ गट्टू नायलॉन मांज्या आढळून आले. पुढील तपासात तिसरा आरोपी तुषार काथार (रा. कोलीवाडा) हा नायलॉन मांज्याची वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडून ४८ गट्टू नायलॉन मांज्या जप्त करण्यात आले.

 

या तिन्ही आरोपींकडून जप्त केलेला नायलॉन मांज्या ‘मोनोफिल गोल्ड’ प्रकाराचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नायलॉन व चायनीज मांज्या अत्यंत धारदार व प्राणघातक असून त्याच्या वापरामुळे अपघात, गंभीर जखमा तसेच पक्ष्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, नायलॉन मांज्या विक्री, साठवणूक किंवा वापराबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ टोल फ्री क्रमांक ११२ किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४०-२२४०५०० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,210 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क