छत्रपती संभाजीनगर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मोंढा नाका उड्डाणपुलावर शनिवारी (दि. २० डिसेंबर) रात्री साडेबारा ते एक वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव कारने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवाशांसह कारमधील नागरिक जखमी झाले. या अपघातात अफतार रझा (रा. जुना बाजार) आणि एका पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अब्दुल बारी (४५, रा. आरेफ कॉलनी) यांच्यासह चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा (एमएच २० ईके ४५५७) सिडको येथून क्रांती चौकाच्या दिशेने जात असताना, पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने (एमएच २० जीक्यू ०२२१) अचानक नियंत्रण सुटल्याने रिक्षाला जबर धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रिक्षातील एक प्रवासी उड्डाणपुलाच्या कठड्यावरून थेट खाली रस्त्यावर फेकला गेला.

अपघाताचा मोठा आवाज होताच पुलावरील वाहनधारक व परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर सध्या उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघातामुळे जालना रोडवरील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात अतिवेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,384 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क