छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, मंगळवारी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणुकीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राजकीय पक्षांच्या इच्छुकांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही अर्ज खरेदीसाठी सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांकडे धाव घेतली.

सकाळी ११ ते दुपारी ३ या चार तासांच्या कालावधीत शहरातील नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून एकूण १ हजार ८१६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र, विशेष बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज विक्री होऊनही एकाही उमेदवाराने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांनी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी शिस्त राखणे प्रशासनासाठी आव्हान ठरले.

प्रभाग क्रमांक २६, २८ आणि २९ अंतर्गत असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सर्वाधिक २४३ अर्जांची विक्री झाली, तर प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० मधून सर्वात कमी १४३ अर्जांची विक्री झाली. बहुतांश इच्छुकांनी एकाच वेळी दोन ते तीन अर्ज घेतल्याचे चित्र दिसून आले. काही इच्छुकांनी वेगवेगळ्या प्रभागांमधून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने स्वतंत्र अर्ज खरेदी केले.

दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तरीही अनेक इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने प्रचाराला सुरुवात केली आहे. देवासमोर नारळ फोडून प्रचार साहित्य ठेवणे, तसेच ‘डोअर टू डोअर’ भेटीगाठी सुरू केल्याचेही चित्र काही प्रभागांत पाहायला मिळाले.

प्रत्येक उमेदवारी अर्जाची किंमत १०० रुपये असून, त्यासोबतच्या माहिती पुस्तिकेसाठीही १०० रुपये मोजावे लागत आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत उमेदवार निश्चित झाल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

568 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क