छत्रपती संभाजीनगर : गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. मात्र, आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ही सुविधा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतही अशी सुविधा देण्यात आली नव्हती. त्यामुळे वयोवृद्ध मतदार व त्यांच्या कुटुंबीयांकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

८५ वर्षांहून अधिक वय असलेल्या अनेक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण ठरते. हालचालींवरील मर्यादा, आजारपण तसेच वाहतूक व्यवस्थेचा अभाव यामुळे अनेक ज्येष्ठांना मतदानापासून वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. याच कारणामुळे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडली होती. मात्र, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशी कोणतीही सवलत दिलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मार्गदर्शक पुस्तिका जाहीर केली असून, त्यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांना घरून मतदान करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित मतदारांना मतदानासाठी केंद्रावरच जावे लागणार आहे. प्रशासनाकडून मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प, बसण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त विकास नवाळे यांनी दिली.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक संघटनांकडून या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष वसंत सबनीस यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न असूनही शासन, प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विधानसभा निवडणुकीत घरी मतदानाची सुविधा देण्यात आली होती, मात्र महापालिका निवडणुकीत ती नाकारण्यात आल्याचे दुःख असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीही आपण मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

370 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क