छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) पासून सुरू झाली आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध कल्पक फंडे वापरले जातात. यात सभांमध्ये नेत्यांच्या हस्ते हवेचे फुगे आकाशात सोडण्याचा प्रकारही सर्रास पाहायला मिळतो. मात्र, आता अशा फुग्यांसाठीही पूर्वपरवानगी घेणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी थेट भारतीय हवाई दलाच्या कार्यालयाकडूनही ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावी लागणार आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान सभा, बैठका, मिरवणुका, पदयात्रा, हेलिकॉप्टरद्वारे प्रचार, व्हिडिओ व्हॅन, वाहनांवर बॅनर-बोर्ड, झेंडे, होर्डिंग, कटआऊट, भित्तीपत्रके, लाऊडस्पीकर यांचा वापर केला जातो. या सर्व बाबींसाठी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित विभागांकडून स्वतंत्र परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. तात्पुरते प्रचार कार्यालय उघडणे, सभागृह किंवा हॉल बुक करणे, वाहनांवर लाऊडस्पीकर लावणे, प्रचार साहित्यांची वाहतूक करणे यासाठीही अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ध्वनिक्षेपकाविना सभा घेण्यासाठीसुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे.

या विविध १२ प्रकारच्या परवानग्यांसाठी महापालिकेत ‘एक खिडकी कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. एनओसीसाठी दाखल होणाऱ्या अर्जांवर २४ तासांच्या आत निर्णय घेण्यात यावा व कोणताही अर्ज २४ तासांपेक्षा जास्त काळ प्रलंबित राहू नये, अशा स्पष्ट सूचना मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, हवेचे फुगे आकाशात सोडण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एअर फोर्स, वाहतूक पोलीस आणि स्थानिक संस्थेची एनओसी जोडावी लागणार आहे. तसेच खर्चाचे सविस्तर विवरणपत्रही सादर करावे लागणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

437 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क