गरवारे स्टेडियमबाहेर निकाल ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चार नागरिकांच्या गळ्यातील सुमारे ५७ ग्रॅम सोन्याच्या साखळ्या तसेच रोख रक्कम असा एकूण ९ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. विशेष म्हणजे, नागरिकांनी प्रसंगावधान राखत दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निकाल ऐकून नागरिक स्टेडियमबाहेर पडत असताना ही घटना घडली. फिर्यादी प्रशांत बाबुलाल जैस्वाल (वय २६, रा. सातारा परिसर) हे गर्दीतून बाहेर पडत असताना एका अज्ञात चोरट्याने त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी तोडली. प्रसंगावधान राखत प्रशांत यांनी सुभाष लक्ष्मण गुंजाळ (वय २०, रा. बीड) याला पकडले. मात्र, सुभाषने चोरीची साखळी गर्दीत उभ्या असलेल्या आपल्या साथीदाराकडे फेकली आणि तो साथीदार घटनास्थळावरून पसार झाला.

पोलिसांनी सुभाषची झडती घेतली असता त्याच्याकडे दुसऱ्या एका सोनसाखळीचा तुकडा आढळून आला. याच घटनेत नरेंद्र आव्हाड यांची सुमारे ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सात्त्विक टेपाळे यांची २७ ग्रॅम सोन्याची चेन व १५ हजार रुपये रोख, तर शुभम गोंडे यांची ३० ग्रॅम सोन्याची साखळी चोरट्यांनी लंपास केली.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोठ्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आरोपी सुभाष गुंजाळ याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तांबोरे पुढील तपास करत असून, पसार झालेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

803 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क