छत्रपती संभाजीनगर :  सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर गुरुवारी (दि. ८ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शहरातील पतंगबाजीच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तुटलेल्या नायलॉन मांजामुळे दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एका तरुणाच्या डोळ्याजवळ तब्बल २१ टाके घालावे लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सय्यद अहमद हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक समोर लोंबकळणारी नायलॉन मांजा त्यांच्या चेहऱ्यावर आला.  वेगात असलेल्या दुचाकीमुळे मांजाने त्यांच्या डोळ्याच्या बाजूला खोल जखम केली. रक्ताच्या थारोळ्यात सापडलेले सय्यद अहमद रस्त्यावरच थांबले असतानाच, त्यांच्या अगदी मागून येणारे शेख यासीन शेख मोसीन (रा. रहेमानिया कॉलनी) हेही त्याच मांजाच्या विळख्यात अडकले. त्यांच्या मानेला मांजा जोरदार घासल्याने गंभीर जखम झाली.

भररस्त्यात एकामागून एक दोन तरुण रक्ताने माखलेले पाहून परिसरातील नागरिक हादरून गेले. मात्र, प्रसंगावधान राखत नागरिकांनी तातडीने लोंबकळणारा मांजा कापून दोघांनाही मदत केली आणि तत्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, सय्यद अहमद यांच्या जखमेची तीव्रता अधिक असून त्यांच्या डोळ्याच्या बाजूला २१ टाके घालावे लागले. सुदैवाने डोळा वाचला असला तरी चेहऱ्यावर कायमस्वरूपी व्रण राहण्याची शक्यता आहे. तर शेख यासीन यांच्या मानेला ३ टाके घालण्यात आले.

या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात पतंगबाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक सोपान नरळे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,073 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क