गंगापूर : लासूर स्टेशन परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या एका अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून तब्बल १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

प्रदीप सुरजमल लोहाडे (रा. परसोळा, ता. वैजापूर) हे ‘दीपचंद सुरजमल अँड कंपनी’ या नावाने गाळा क्रमांक २० मध्ये अडत दुकान चालवतात. मंगळवारी दुपारी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १० लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. यापूर्वीच ड्रॉवरमध्ये ३ लाख ३७ हजार रुपये ठेवलेले होते.

दुपारी दोनच्या सुमारास मालाची पाहणी करण्यासाठी लोहाडे काही वेळासाठी दुकानाबाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूच्या दरवाजातून आत प्रवेश केला. चोरट्याने ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील एकूण १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

काही वेळानंतर लोहाडे दुकानात परत आल्यानंतर पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पिशवी घेऊन निघालेला चोर स्पष्टपणे दिसून आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून बँकेपासून दुकानापर्यंतच्या मार्गावरील कॅमेरेही तपासले जात आहेत.

या घटनेमुळे लासूर स्टेशन परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बाजार समितीत सुरक्षा वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,435 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क