छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली असून एका लघुउद्योजकाच्या घरातून तब्बल १५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. व्यवसायासाठी मित्रांकडून रोख स्वरूपात घेतलेली ही रक्कम घरातच ठेवणे जगधने कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी मयूर पार्क परिसरातील हरसिद्धी हाऊसिंग सोसायटीत घडली असून याप्रकरणी ११ फेब्रुवारी रोजी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक जगधने (वय ६२) हे पत्नीसमवेत सदर सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्याच परिसरात त्यांची मुलगीही राहते. जगधने यांचा वाळूज औद्योगिक परिसरात वाहनांचे पार्ट्स तयार करण्याचा लघुउद्योग असून ते एका नामांकित वाहन कंपनीचे व्हेंडर आहेत. त्यांची पत्नीही नोकरी करत असल्याने दोघे दररोज सकाळी घर बंद करून कामावर जातात.

१० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दोघे नेहमीप्रमाणे बाहेर गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरकाम करणारी महिला घरी गेली असता मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. तिने तत्काळ ही माहिती जगधने यांना दिली. त्यानंतर जगधने दाम्पत्य घरी पोहोचले असता घरातील खोलीतील लाकडी कपाटाचे लॉकर फोडलेले आढळले. त्यामधील ५०० रुपयांच्या नोटांचे सुमारे ३० बंडल असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते, मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते बंद होते. शिवाय, मुख्य दरवाजाला लॅच लॉकही लावण्यात आले नव्हते. या निष्काळजीपणाचा फायदा घेत चोरट्यांनी भरदिवसा सोसायटीत प्रवेश करून घरफोडी केली.

विशेष बाब म्हणजे घरात चांदीचे व इतर दागिने असतानाही चोरट्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत थेट रोख रकमेवरच हात साफ केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. शहरात वाढत चाललेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

847 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क