छत्रपती संभाजीनगर :  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी येत्या १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडणार आहे. अध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य मतदानाद्वारे नवीन अध्यक्षांची निवड करणार आहेत.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या निवड प्रक्रियेसाठी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूने यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची नामांकनपत्रे सभेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी स्वीकारली जाणार आहेत. सभेसाठी एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश (१/३) गणपूर्ती आवश्यक राहणार आहे. प्रत्यक्ष मतदानानंतर ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी आपल्या सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी काही पक्षांकडून सदस्यांना सहलीवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, जिल्ह्यातील सर्व ९ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी १० मार्च रोजी दुपारी २ वाजता संबंधित पंचायत समित्यांच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रथम सभापती पदाची निवड होईल आणि त्यानंतर तत्काळ उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

499 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क