छत्रपती संभाजीनगर : शहरातील नारळीबाग परिसरात तपासकामी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकास एका हॉटेल चालकाने दमदाटी करत अपमानास्पद वागणूक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकी लावण्यावरून वाद घालत आरोपीने उपनिरीक्षकाची चावी हिसकावून घेत त्यांना पोलिस ठाण्यात पायी जाण्यास भाग पाडले. ही घटना २२ मार्च रोजी दुपारी घडली असून, सिटीचौक पोलिसांनी गुन्हा दाखल करताच आरोपी फरार झाला आहे.

राहुल शिंदे (वय ३१) हे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सिटीचौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते दुपारी सुमारे १२ वाजता एका गुन्ह्याच्या तपासासाठी नारळीबाग परिसरात गेले होते. जेपी इंटरनॅशनल हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत त्यांनी आपली दुचाकी उभी करून बातमीदाराला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी प्रीतेश उर्फ बंटी प्रकाश जैस्वाल (रा. नारळीबाग) याने त्यांना अडवत ‘तू पोलिस आहेस का, पोलिसांनी येथे येऊ नये’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढताच आरोपीने अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ करत धमकावले. उपनिरीक्षक शिंदे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, ‘खूप पोलिस पाहिलेत, पोलिस माझे काही करू शकत नाहीत’ असे म्हणत त्याने दुचाकीची चावी हिसकावून घेतली. तसेच त्यांना पायी पोलिस ठाण्यात जाण्यास भाग पाडले. अनावश्यक वाद टाळण्यासाठी शिंदे यांनी तेथून निघणे पसंत केले.

दिवसभर बंदोबस्त आणि इतर कामे पूर्ण केल्यानंतर शिंदे यांनी वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. रात्री उशिरा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली. मात्र तोपर्यंत जैस्वाल घर व हॉटेल सोडून फरार झाला होता.

दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हॉटेलमधील हॉस्टेल व अभ्यासिकेच्या वैधतेचीही चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,088 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क