छत्रपती संभाजीनगर : शहरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पश्चिम बंगाल येथील एका सराफा कारागिराने घरमालकासह दोन सराफा व्यापाऱ्यांची फसवणूक करून तब्बल १७७ ग्रॅम सोने लंपास केले आहे. या प्रकरणी २६ मार्च रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेघनाथ बिमल रॉय (वय ४१, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. स्माईल टॉवर, जुना बाजार) असे आरोपीचे नाव असून, तो गेल्या १३ वर्षांपासून कुटुंबासह जुना बाजार परिसरात राहत होता. फिर्यादी अब्दुल लतीफ अब्दुल कादर (वय ४८) हे मोबाइल शॉपी चालक असून, त्यांच्या घरातच आरोपी भाड्याने राहत होता. तसेच कासारी बाजारात त्याचे दागिने बनविण्याचे दुकान होते.
२० सप्टेंबर २०२५ रोजी अब्दुल लतीफ यांनी नेकलेस बनवण्यासाठी ६० ग्रॅम २४ कॅरेट सोने आरोपीकडे दिले होते. दिवाळीच्या कामाचा ताण असल्याचे सांगत त्याने काम लांबवले. ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नेकलेस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याच रात्रीपासून त्याचा फोन बंद लागला. घर व दुकानात शोध घेतला असता तो गायब असल्याचे समोर आले.
तपासात समोर आले की, आरोपीने अब्दुल लतीफ यांचे ६० ग्रॅम, उदय त्रिंबकराव सराफ यांचे ५९.५०० ग्रॅम आणि शेख कदीर माहीमेनू शेख यांचे ५७ ग्रॅम असे एकूण १७७ ग्रॅम सोने लंपास केले आहे. फरार झाल्यानंतरही तो अधूनमधून संपर्कात राहून “आज देतो, उद्या देतो” अशी टाळाटाळ करत होता.
सुमारे पाच महिने फिरवणूक केल्यानंतर अखेर पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E8LjDsy4JpoKzFHBA67enK?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*