छत्रपती संभाजीनगर : वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी जेवणाची ऑर्डर देण्याचा बहाणा करून केटरिंग व्यावसायिकाला बोलावून घेत चौघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लुटारूंनी आधी त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून त्यांना निष्प्रभ केले, त्यानंतर दांडे आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाकडून ४ ग्रॅमच्या बाळ्या, मोबाइल आणि ५५ हजार ९०० रुपयांची रोकड असा ऐवज लंपास करण्यात आला.

ही घटना १८ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास लिंक रोडवरील प्रभू हॉटेलच्या मागील बाजूस घडली. या प्रकरणी सागर प्रकाश सरदार (३२, रा. सुदर्शन सोसायटी, एमआयडीसी क्वॉर्टर, वेदांतनगर) यांनी उपचार घेतल्यानंतर २१ मार्च रोजी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सागर सरदार हे केटरिंग व्यवसाय करतात.

फिर्यादीनुसार, १७ मार्च रोजी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला होता. संबंधित व्यक्तीने “खुलताबाद येथे तुम्ही केलेला शाबुदाणा खिचडीचा भंडारा आम्हाला आवडला, माझ्याकडेही वास्तूशांतीचा कार्यक्रम आहे, ३०० लोकांच्या जेवणाची ऑर्डर द्यायची आहे,” अशी बतावणी केली. त्यावेळी सागर हे दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांनी नंतर भेटण्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर संबंधिताचा फोन बंद होता.

१८ मार्च रोजी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्यांना लिंक रोडवरील प्रभू हॉटेलच्या मागे भेटण्यास सांगण्यात आले. तेथे पोहोचल्यावर सुरुवातीला कोणीही न दिसल्याने ते परत निघाले. मात्र, पुन्हा फोन आल्याने ते परत त्या ठिकाणी गेले.

तेथे दोन जण दुचाकीजवळ उभे होते. त्यांनी मेन्यू ठरवण्याच्या बहाण्याने सागर यांना बाजूला, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेले. तेथे आधीच आणखी दोघे दबा धरून बसले होते. अचानक एकाने सागर यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली, तर दुसऱ्याने त्यांना पकडून तोंडात कापड कोंबले. उर्वरित दोघांनी लाकडी दांडे व रॉडने पाय, पाठ, कंबर आणि हातांवर मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले.

यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील सोन्याच्या बाळ्या, मोबाइल आणि रोकड हिसकावून पळ काढला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

644 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क