छत्रपती संभाजीनगर : वाढत्या उन्हाचा तडाखा आणि रविवारची सुट्टी असा दुग्धशर्करा योग साधून हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या या तरुणांवर काळाने झडप घातल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रचंड उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने गारवा मिळवण्यासाठी हे तरुण हर्सूल तलाव परिसरात पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला तीन तरुण तलावात बुडाल्याची माहिती स्थानिकांकडून अग्निशामक दलाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

दरम्यान, तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अग्निशामक दलाने शोधमोहीम अधिक तीव्र करत त्या भागातही तपास सुरू केला. काही वेळाने चौथ्या तरुणाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. या दुर्दैवी घटनेने उपस्थित नागरिक हादरून गेले.

मृतांपैकी अफान खान इस्माईल खान (वय अंदाजे १७ वर्षे) आणि शेख आदिल शेख मोहसीन (वय अंदाजे १५ वर्षे) अशी दोन जणांची ओळख पटली आहे. उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

उन्हाळ्यात तलाव, धरणे आणि जलसाठ्यांवर पोहण्यासाठी तरुणांची गर्दी वाढत असते. मात्र, पाण्याचा अंदाज न येणे आणि सुरक्षेची अपुरी साधने यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. रविवारची सुट्टी या चार तरुणांच्या आयुष्यातील शेवटची ठरल्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने नागरिकांना अनोळखी ठिकाणी पोहताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,050 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क