छत्रपती संभाजीनगर : शहरातील बन्सीलालनगर परिसरात आलिशान जीवन जगणाऱ्या एका एमबीए शिक्षित तरुणाने व्यवसायातील तोट्यामुळे कर्जबाजारी होत अखेर मंगळसूत्र चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने तिसरा गुन्हा करण्यापूर्वीच आरोपीला समर्थनगर परिसरातून अटक केली असून त्याच्याकडून अडीच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
अमोल बालाजी बाराटे (वय २९, रा. बन्सीलालनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो न्यूट्रिशन सप्लिमेंटरी पावडर विक्रीचा व्यवसाय करत होता. बन्सीलालनगरमध्ये पाचव्या मजल्यावरील फ्लॅट, गारखेड्यातील उच्चभ्रू खिंवसरा पार्क परिसरातील वास्तव्यासह त्याच्याकडे थार आणि साडेचार लाख रुपये किमतीची बुलेटही होती. मात्र, व्यवसायात मोठा तोटा झाल्याने तो सुमारे पाच लाख रुपयांच्या कर्जाखाली दबला गेला होता.
२३ जून रोजी समर्थनगर परिसरात दिपाली जाधव यांच्या गळ्यातील सोनसाखळी तर २६ जून रोजी संत एकनाथ रंगमंदिरासमोर सुनिता सांगवीकर यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ हिसकावण्यात आला होता. या दोन्ही घटनांचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल डेटा आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अमोल बाराटे याच्यावर पाळत ठेवली.
आरोपी मेहुण्याच्या नावावरील मोपेडची नंबरप्लेट काढून चोरीसाठी वापरत असल्याचे तपासात उघड झाले. तिसरा गुन्हा करण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने समर्थनगर परिसरातून त्याला अटक केली. दरम्यान, चोरीतील २० ग्रॅमचा सोन्याचा गोफ त्याने कॉलेजमधील सराफा व्यावसायिक मित्राकडे मोडण्यासाठी देऊन सुमारे अडीच लाख रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*